चला शिवसैनिकांनो “प्रतिकार” करूया!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण आपला देश खरचं प्रजासत्ताक राहिला आहे काय? हा प्रश्न आज ज्याला पडत नाही, अस्वस्थ करत नाही त्याला प्रजासत्ताक शब्दाचा अर्थच समजलेला नाही..
२६ जानेवारीला सकाळी लवकर उठून झेंडे मिरवण्यापुरता प्रजासत्ताक दिन मर्यादित नाही, प्रत्येक नागरिकाला विशेषतः मतदाराला आपल्या कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे आहे..
काल राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला आणि आज प्रजासत्ताक दिन साजरा होतोय.. पण लोकशाहीतील खरतर सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या मतदानाच्या अधिकाराचा आज चक्क लिलाव होतो आहे किंवा तो १२ च्या भावात विकला जातोय..
देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाजपप्रणीत सरकार पाशवी बहुमताने बसलेले असताना सुद्धा पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा खुलेआम केली जात आहे.. पक्ष फोडणे ही चाणक्यनिती कशी आणि तो भीष्मपराक्रम कसा हे लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याचा चोथा झाला आहे तो विशेष रिपोर्ट बनवून उत्साहाने मांडतोय..
महाराष्ट्रातील नागरिकांनी तर १५०० रुपयांना मतदानाचा अधिकार गहाण ठेवला.. आता सरकार जनतेवर वरवंटा फिरवून १५०० रुपये वसूल करण्याच्या तयारीत आहे.. महाराष्ट्रात जनतेला भुलवून सत्ता विकत घेण्यात आली.. पाशवी बहुमताचा सरकारला राज्यकारभार चालवता येत नाही.. महाराष्ट्रात गुंडगिरीचा हैदोस वाढतोय.. अत्याचार वाढत आहेत.. हे सगळं होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री जे मागील १० वर्षांपैकी ७.५ वर्षे गृहमंत्री होते आणि आता पुन्हा ५ वर्षे (दिल्लीने दोर कापले नाहीत तर) असणार आहेत त्यांचं राज्यावर गृहमंत्री म्हणून कोणतंही नियंत्रण नाही.. महाराष्ट्राचा स्वाहाराष्ट्र करण्यात त्यांचे अनमोल योगदान आहे..
दिल्लीचा गाढवाचा नांगर महाराष्ट्रावर फिरवण्यासाठी तीन बैल कार्यरत आहेत.. महाराष्ट्राचा ठाकरी विचार आणि ठाकरे परिवार संपवण्यासाठी राज्याचे व देशाचे सरकार संपूर्ण ताकदीने कार्यक्रम राबवत आहे.. ठाकरे हा नुसताच परिवार नसून तो विचार आहे.. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आज नेटाने ही हुकूमशाही आणि जुलूमशाही संपवण्यासाठी लढत आहेत.. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्राणपणाने महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे यांच्यासाठी लढणं ही काळाची गरज आहे.. दिल्लीच्या हुकूमशहांनी ठाकरे आणि शिवसेना संपवूनच दाखवावी हे सर्वसामान्य शिवसैनिकांचे त्यांना आव्हान आहे.. तुम्हाला नेते विकत मिळतील पण एकही सामान्य शिवसैनिक तुम्हाला विकत घेता येणार नाही.. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेना राहणारच आणि शिवसेनेचे नेतृत्व काल, आज, उद्याच नव्हे तर सदैव ठाकरेंकडेच राहणार.. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही..
आज बाळासाहेब असते तर त्यांच्या ठाकरी भाषेत म्हणाले असते “पोरगं कुणी दत्तक घेतलं म्हणून बापाला विसरता नाही येणार..” तेंव्हा गद्दार आणि त्यांच्या गुजराती सरदारांनी एक काय शंभर बनावट शिवसेना उभ्या केल्या तरी त्यांना खरी शिवसेना संपवता येणार नाही..
शिवसेना संपवण्यासाठी पैशांचा जसा वापर होतोय त्यापेक्षा लाखपटीने तो सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या असत्य बातम्यांच्या विषाचा होतो आहे.. हे विष महाराष्ट्र आणि देशाच्या नसानसांत भिनलेले आहे.. त्याच विषाच्या अंमलाखाली जे राज्यकर्ते जनतेला निवडणुकीपूर्वी नको होते आणि नंतरही नको आहेत त्याच नाकर्त्या राज्यकर्त्यांना जनतेने पुन्हा मतदान केलं.. हे विष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या नसांतुन हटवणे अतिशय गरजेचे आहे..
खोटं, खोटं, खोटं किती खोटं? सत्य आणि असत्याचा एक साधा नियम आहे.. सत्य कोणीही बोललं नाही तरी ते सत्याच राहणार आणि असत्य अगदी सगळ्यांनी मान्य केलं तरी ते असत्यच राहणार.. पण हा सत्य आणि असत्याचा भेद करण्याची कुवत आज सर्वसामान्य जनतेच्या मेंदूची राहिलेली नसून तो फेक न्युजच्या कॅन्सरमुळे पोखरला गेला आहे.. दिल्लीच्या पाशवी राजवटीला आव्हान देणं हा महाराष्ट्राचा मुळ स्वभावच महाराष्ट्र विसरतोय.. दिल्लीच्या रक्षणासाठी छाती पुढे करून जाणारा महाराष्ट्र आज स्वतःची अस्मिता विसरून दिल्लीच्या पायाशी पडला आहे.. तेंव्हा महाराष्ट्राचं फेल झालेलं हार्ट दिल्लीचा प्रतिकार कसा करणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी २३ जानेवारीच्या मेळाव्यात फेक नॅरेटिव्हचा उल्लेख केलाच.. शिवसेना निवडणुकीत फारसं यश मिळवू शकली नाही याचं मूळ कारण हे प्रिपरेशन नसून ते पर्सेप्शन आहे.. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात शिवसेना आणि ठाकरे यांच्याविषयी जे प्रेम आहे आणि भावना आहे त्याचाच घात करण्यात आलेला आहे.. संघी विषवल्लीने महाराष्ट्राचा मेंदू लुळा-पांगळा करून त्याचा पार खुळखुळा केला आहे जो त्यांच्या सोयीनुसार वाजतो आणि दिल्लीच्या तालावर अवघा महाराष्ट्र नाचतो हे चित्र छञपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मान्य झालं असतं का? उद्धव ठाकरेंच्या नसलेल्या गोष्टी आहेत म्हणून दाखवायच्या आणि भाजपसोबत असलेल्या लाचारांच्या उघड्याबंब घोटाळ्यांवर पांघरून घालायचं.. मुस्लिमांच्या विषयक बातम्या पसरवून हिंदूंना भीती दाखवून त्यांची माथी भडकावून निवडणुका जिंकायच्या हे पाप खुलेआम झालं.. कसलं हिंदुत्व? ते कोण शिकवणार? संघ आणि भाजप? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला तुम्ही कसलं बोडक्याच हिंदुत्व शिकवताय?
उद्धव ठाकरेंनी हिरवे कपडे परिधान केल्याचे फोटो, टोपी घातल्याचे फोटो, मुस्लिमांची माफी मागितल्याचा बातम्या, हिंदुत्व सोडल्याच्या बातम्या पसरवून मतदारांचा लुळा-पांगळा मेंदू भाजपने हॅक केला..
संघ परिवार आणि भाजप यांच्यात समोरून लढण्याची ताकद कधीच नव्हती, नाही आणि यापुढेही नसेल.. ती निधडी छाती केवळ शिवसैनिकांची आहे.. मराठी माणसाची आहे.. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजनाथ सिंह यांनी मुस्लिमांची माफी मागितली हे सत्य आहे.. तत्पूर्वी लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांनीही ती मागितली होतीच.. अखंड भारताचे स्वप्न आणि हिंदुराष्ट्र संकल्पना मांडणाऱ्या संघ-भाजपाचे प्रमुख नेते अडवाणी अखंड भारताचे तुकडे करणाऱ्या मुहम्मद अली जिनाच्या कबरीवर आपले टक्कल घासून पॉलिश करायला गेले होते काय? भाजप आणि संघाच्या अडण्यांना अडवाणी दिसत नाहीत.. त्यांना केवळ ठाकरे द्वेषाची कावीळ झाली आहे.. पुन्हा सांगतो.. शिवसेना आणि ठाकरेंना कोण कसा संपवतो तेच आम्ही सामान्य शिवसैनिक पाहू.. वक्फ बोर्डाच्या संदर्भात अफवा पसवल्या गेल्या.. १० वर्षे केंद्रात बहुमताचे सरकार असताना वक्फ बोर्डावर बंदी घालण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चे काढण्यात वक्त कशाला घालवला? तुमची मागणी तुमच्याच सरकारला सांगून पूर्ण करून घ्यायला कोणती अडचण होती? की फक्त ढोंग करून मतदानासाठी हट्ट केला? भाजपच्या आणि मोदींच्या कथनी व करणीत जमीन अस्मानाचा नव्हे तर पाताळ अस्मानाचा फरक आहे..
निवडणूक आयोग आणि ईडी, सीबीआय, आयटी हे तर दूरच पण देशाची न्यायसंस्था सुद्धा स्वायत्त राहिलेली आहे का यावर आता जनतेला विश्वास राहिलेला नाही.. हो.. नाही राहिलाय विश्वास.. एखाद्याचा पक्ष बहुमताच्या नावाखाली दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणालाही नाही.. असं असल्यास उद्या एखाद्या माणसाचं पोरं गावाने विरोधात मतदान केलं म्हणून दुसऱ्याला द्यायला आजची व्यवस्था कमी करणार नाही..
आता प्रश्न असा येतो की हे सगळं घडत असताना स्वस्थ बसायचं कसं? हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहत बसलो तर बाळासाहेब माफ करणार नाहीत.. त्यांनी दिलेला विचार आचरणात आणून अन्यायावर आणि असत्यावर वार करणं तसेच सत्याचा स्वीकार करणं हेच खरी शिवसेना आणि शिवसैनिकांचे कर्तव्य.. तेंव्हा चला शिवसैनिकांनो.. प्राणपणाने “प्रतिकार” करूया!
जय हिंद! जय महाराष्ट्र!!

